Woman robbed of lakhs in Hadapsar एसटी प्रवासात ७० वर्षीय वृद्ध महिलेची लाखोंची चोरी; हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, प्रवाशांनी सतर्क राहण्याचे आवाहन
पुणे: पुणे शहरात एसटी बसने प्रवास करणाऱ्या एका ७० वर्षीय वृद्ध महिलेची लाखोंची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. बसमधील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी महिलेकडील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लंपास केले आहेत.
ही घटना दि. २६/०८/२०२५ रोजी दुपारी १२ ते ३ वाजण्याच्या दरम्यान घडली. फिर्यादी या दौंड तालुक्यातील खडकी येथून करमाळा-स्वारगेट बसने प्रवास करत असताना हा प्रकार घडला. बसमधील गर्दीचा फायदा घेत, अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्याजवळील बॅगेतून किंवा पर्समधून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरी केले.
या चोरीत फिर्यादीचे ३,०००/- रुपये रोख आणि १,००,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, असा एकूण १,०३,०००/- रुपयांचा ऐवज चोरीला गेला.
या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अंमलदार जाधव अधिक तपास करत आहेत. प्रवासादरम्यान, विशेषतः गर्दीच्या ठिकाणी, नागरिकांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी आणि कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.