पुणे: बनावट पोलीस बनून एका तरुणाला धमकावून खंडणी उकळण्याचा धक्कादायक प्रकार सहकारनगर परिसरात उघडकीस आला आहे. एका अज्ञात जोडप्याने, आपण पोलीस असल्याचे भासवून एका तरुणाचे अपहरण केले आणि त्याला मारहाण करून त्याच्याकडून गुगल पे द्वारे पैसे जबरदस्तीने घेतले.
ही घटना दि. २७/०८/२०२५ रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास धनकवडी येथील ईशा लॉज येथे घडली. फिर्यादी आपल्या कामावर असताना एक अनोळखी पुरुष आणि महिला त्यांच्याजवळ आले. त्यांनी आम्ही पोलीस असल्याचे सांगत लॉज चेक करायचा आहे असे सांगितले. त्यांनी रिसेप्शनवरील रजिस्टर तपासले.
त्यानंतर, 'तू आमच्यासोबत पोलीस ठाण्यात चल,' असे सांगून त्यांनी फिर्यादीला त्यांच्या चारचाकी गाडीत जबरदस्तीने बसवले. गाडी स्वारगेटच्या दिशेने नेत असताना आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करत मारहाण केली आणि धमकावले.
आरोपींनी फिर्यादीला जबरदस्तीने त्यांच्या मोबाईलमधून गुगल पे द्वारे ६,०००/- रुपये स्वतःच्या खात्यावर ट्रान्सफर करायला लावले आणि त्याला सोडून निघून गेले.
या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. नागरिकांनी अशा बनावट पोलिसांपासून सावध रहावे आणि कोणत्याही संशयास्पद व्यक्तीने पोलीस असल्याचे सांगितल्यास त्यांची ओळखपत्र तपासावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.