पुणे, ०५ ऑगस्ट २०२५: काळेवाडी परिसरातील रहाटणीमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. घरासमोर खेळणाऱ्या एका दोन वर्षांच्या चिमुकलीला भरधाव वेगात आलेल्या कारने धडक दिली. या भीषण अपघातात त्या निरागस मुलीचा जागीच मृत्यू झाला असून, कारचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.
नेमकी काय घडली घटना?
शनिवार (दि. ०२ ऑगस्ट २०२५) रोजी सायंकाळी ६:१५ ते ६:४५ वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. रहाटणीतील शिवराज नगर, कॉलनी नं. २ येथे फिर्यादी शिवराज जळबा देवरे (वय २४) यांची मुलगी सुकन्या शिवराज देवरे (वय २ वर्षे) घरासमोर खेळत होती.
त्याच वेळी, आरोपी जय योगेशकुमार लाठीवाला (रा. साई मिरॅकल सोसायटी, शिवराजनगर, रहाटणी, पुणे) याने आपली पांढऱ्या रंगाची XUV 3X0 कार (एमएच १४ एलवाय ६२०१) अत्यंत निष्काळजीपणे, हयगयीने आणि भरधाव वेगात चालवली. भरधाव वेगात असलेल्या या कारने खेळणाऱ्या चिमुकलीला जोरदार धडक दिली.
या अपघातात सुकन्याला गंभीर दुखापत झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडवून, कारचालक जय लाठीवाला कोणतीही मदत न करता, घटनास्थळावरून पळून गेला.
पोलिसांची कारवाई
या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३१६/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६, १२५ (अ), १२५ (ब) सह मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार आरोपी जय लाठीवालाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी जय लाठीवाला याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. निष्पाप चिमुकलीच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.