पुणे, ०७ ऑगस्ट २०२५: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका पतीने तिला लाकडी बेलणे, पीव्हीसी पाईप आणि चाकूने बेदम मारहाण करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत मुलांनी आईला वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
नेमकी काय घडली घटना?
मंगळवार (दि. ०५ ऑगस्ट २०२५) रोजी सायंकाळी ६:०० ते ८:३० वाजण्याच्या सुमारास ही क्रूर घटना घडली. खराबवाडी, ता. खेड येथे ओंकार खराबी यांच्या खोलीत हा प्रकार घडला.
फिर्यादी महिलेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन रामआसरे यादव (वय २३, रा. खराबवाडी, चाकण) हा त्याच्या पत्नीवर नेहमी संशय घ्यायचा. ती गॅलरीत उभी राहून इतर पुरुषांकडे पाहते, असा त्याला संशय होता. याच संशयावरून तो तिच्याशी सतत भांडण करून मारहाण करायचा. पंधरा दिवसांपूर्वीही त्याने तिला लाकडी बेलणे आणि पीव्हीसी पाईपने मारले होते.
०५ ऑगस्ट रोजी दिवसभर त्याने याच संशयावरून पत्नीशी भांडण केले. सायंकाळी ६:०० ते ८:३० दरम्यान त्याने संशयाच्या भरात पत्नीला प्लॅस्टिकचे स्टूल, लाकडी बेलणे, पीव्हीसी पाईप आणि लाकडी काठीने दोन्ही पाय, दोन्ही हात आणि डोक्यावर निर्दयीपणे मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, त्याने तिच्या पोटाला चाकू लावून "आज तुला जिवे मारतो" अशी धमकी दिली आणि तिला मारहाण करून तिची हत्या केली.
आईला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या मुलाला, प्रिन्सलाही त्याने पाठीवर बेलण्याने मारले. तसेच, मुलगी पलक आणि मुलगा प्रिन्स यांनाही धमकावले.
पोलिसांची कारवाई
या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५५२/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), ११८ (१), २३८, ३५१ (२) (३) नुसार आरोपी सचिन रामआसरे यादव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी सचिन यादवला अटक केली आहे. कौटुंबिक वादातून आणि संशयातून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.