पुणे, ०७ ऑगस्ट २०२५: पिंपरीतील एका बारमध्ये दारूच्या बिलावरून झालेल्या वादातून एका आरोपीने पिस्तूल काढून हॉटेल मालकाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे.
नेमकी काय घडली घटना?
मंगळवार (दि. ०५ ऑगस्ट २०२५) रोजी रात्री ११:०० वाजल्यापासून ते बुधवारी (दि. ०६ ऑगस्ट २०२५) रात्री १:२५ वाजेपर्यंत ही घटना घडली. पिंपरीतील जुन्या मुंबई-पुणे हायवेवर असलेल्या उडपी बार आणि रेस्टॉरंटमध्ये हा प्रकार घडला.
हॉटेलचे मालक आणि फिर्यादी निवृत्ती एकनाथ वाघ (वय ४०, रा. पिंपरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी सनी अशोक परदेशी (वय ३२, रा. पिंपरी) आणि रोहित बोथ (वय २५, रा. पिंपरी) यांनी जेवण आणि दारू प्यायल्यानंतर १९४३ रुपयांचे बिल देण्यास नकार दिला.
बिल मागितल्यावर त्यांनी निवृत्ती वाघ यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. "तुझ्या गांडीत गोळ्या घालतो, तू मला ओळखत नाहीस काय?" असे म्हणत आरोपी सनी परदेशीने त्याच्या कमरेला लावलेले पिस्तूल बाहेर काढले. त्याने पिस्तूल लोड करून निवृत्ती वाघ यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
पोलिसांची कारवाई
या प्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. २७९/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३०८ (५), ३५२, ३५१ (२) (३), ३ (५), शस्त्र अधिनियम कलम ३ (२५), आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही आरोपी सनी अशोक परदेशी आणि रोहित बोथ यांना अटक केली आहे. किरकोळ बिलावरून पिस्तुलाचा वापर करून दहशत माजवण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर असून, पोलिसांनी अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई केली आहे.