मंडळाच्या वादातून पुण्यात 'भाईगिरी'चा हैदोस! कार्यकर्त्याला लोखंडी हत्याराने मारहाण, ५ जणांना अटक
पुणे, ७ ऑगस्ट २०२५: पुण्यात मंडळाच्या बोर्डवरून झालेल्या वादातून एका कार्यकर्त्यावर लोखंडी हत्याराने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीतील केळकर रोडवर हा प्रकार घडला असून, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पाचही आरोपींना अटक केली आहे.
नेमकी काय घडली घटना?
मंगळवार (दि. ०५ ऑगस्ट २०२५) रोजी रात्री ८:४५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. केळकर रोडवरील विनायक मंडळाच्या जवळील निघोजकर मंगल कार्यालयासमोर ही घटना घडली.
फिर्यादी (वय ३४, रा. केळकर रोड, पुणे) यांच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मुरलीधर हॉटेलजवळील पूजा पेंटरच्या समोर सार्वजनिक रस्त्यावर एक बोर्ड लावला होता. आरोपी मुकुंद शंकर शिर्के (वय २७, रा. नारायण पेठ), हर्षे शंकर शिर्के (वय २९, रा. नारायण पेठ), अभिषेक उमेश थोरात (वय २२, रा. दत्तवाडी), निखिल दिलीप जगताप (वय ३३, रा. शनिवार पेठ) आणि समीर जाफर जमादार (वय २९, रा. रहाटणी) हे पाचजण तो बोर्ड काढण्यासाठी तिथे आले.
यावेळी फिर्यादी यांनी त्यांना "हा बोर्ड काढू नका, तो बेकायदेशीर असल्यास पुणे मनपा स्वतः काढून घेईल," असे सांगितले. याच कारणावरून आरोपींनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली आणि जिवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी हत्याराने त्यांच्या बोटावर आणि पाठीवर वार केले. यात फिर्यादी गंभीर जखमी झाले.
पोलिसांची कारवाई
या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गु.र.नं. १८५/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम १०९, १८९ (२), १८९ (४), १९०, १९१ (३), ३५१ (३), ३५२, १३३, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१), १३५, आर्म्स ॲक्ट कलम ४ (२५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पाचही आरोपींना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) अरुण घोडके या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. मंडळाच्या वादातून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याचे या घटनेतून दिसून येत आहे.