पुणे: नोकरीच्या आमिषाने १७ लाखांची फसवणूक; हिंजवडीतील कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना गंडा घालण्याचा एक धक्कादायक प्रकार पुणे शहरातील हिंजवडी परिसरात समोर आला आहे. एका कंपनीने चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवून अनेक तरुणांकडून लाखो रुपये घेतले आणि त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी १७ लाख रुपयांहून अधिक रकमेचा अपहार झाल्याची माहिती आहे.Fraud with the lure of a job
हिंजवडी येथील 'फ्लायनट सास प्रा. लि.' या कंपनीने विविध कन्सलटन्सीच्या माध्यमातून तरुणांना दरवर्षी मोठ्या पगाराचे आमिष दाखवले. त्यानंतर त्यांना १ लाख ते २.५ लाख रुपये कंपनीच्या बँक खात्यात जमा करण्यास भाग पाडले. फिर्यादीनुसार, पैसे मिळाल्यानंतर आरोपींनी त्यांना बनावट ऑफर लेटर आणि नियुक्तीपत्र पाठवले. तसेच, गुगल मीटच्या माध्यमातून ऑनलाइन ट्रेनिंगही दिली.
ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर आरोपींनी तरुणांकडून सुमारे ७ ते ८ महिने ऑनलाइन काम करून घेतले, मात्र त्यांना पगार दिला नाही. 'आय.जी.पी. परीक्षा' किंवा मुलाखतीत नापास झाल्यासारखी कारणे देऊन त्यांनी पगार थांबवला. अशाप्रकारे फिर्यादी आणि इतर तरुणांची एकूण १७ लाख १६ हजार ५०० रुपयांची फसवणूक करण्यात आली.
या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपींपैकी उपेश रणजित पाटील याला अटक केली आहे.
नोकरीसाठी कोणत्याही कंपनीत पैसे भरण्यापूर्वी तिची खातरजमा करणे अत्यंत आवश्यक आहे. नोकरी देण्याच्या नावाखाली पैसे मागणारे लोक फसवणूक करणारे असू शकतात, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.Fraud with the lure of a job