पुणे: ऑनलाइन गुंतवणुकीच्या नादात ३३ लाखांची फसवणूक! व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारांचा डाव Online investment
पुणे: शहर सायबर गुन्हेगारांचे नवीन लक्ष्य बनले आहे. ऑनलाइन गुंतवणुकीच्या आकर्षक जाहिरातींना बळी पडून एका तरुणाला तब्बल ३३ लाख ७३ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची धक्कादायक घटना हिंजवडी परिसरात समोर आली आहे.
ही फसवणूक एका व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून करण्यात आली. हिंजवडी येथे नोकरी करणाऱ्या दर्पण राजेश्वर राव यांना फेसबुकवर शेअर मार्केटमधील गुंतवणुकीबाबत एक पोस्ट दिसली. त्यातून त्यांनी '222 FYERS VIP trading strategy' हा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन केला. ग्रुपमधील आरोपींनी त्यांना सुरुवातीला केवायसीसाठी पॅनकार्ड अपलोड करण्यास सांगितले. त्यानंतर 'FYERS HNI' नावाचे एक अॅप डाउनलोड करण्यास सांगून, त्यामध्ये गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होईल, असे आमिष दाखवले.
आरोपींनी त्या अॅपवर मोठी रक्कम आल्याचे खोटे दाखवून दर्पण यांचा विश्वास जिंकला. यानंतर त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यांवर (उदा. येस बँक, कोटक महिंद्रा बँक, इत्यादी) पैसे पाठवण्यास सांगितले. अशा प्रकारे, दर्पण यांनी एकूण ३३,७३,२८०/- रुपये गुंतवले. जेव्हा त्यांनी आपले पैसे परत मागितले, तेव्हा आरोपींनी आणखी पैशांची मागणी केली.
या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक पाडगे पुढील तपास करत आहेत. मात्र, आरोपी अद्याप फरार आहेत. ऑनलाइन फसवणुकीचे हे वाढते प्रकार पाहता, नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता, अशा स्कीमची पडताळणी करावी आणि अज्ञात व्यक्तींना आपले पैसे किंवा माहिती देऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.