गाडीच्या चावीवरून वाद; पुण्यात भावानेच भावाची निर्घृण हत्या केली, आरोपी अटकेत
पुणे, ८ ऑगस्ट २०२५: गाडीची चावी न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका भावाने दुसऱ्या भावावर निर्घृण हल्ला करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. खडक पोलीस स्टेशन हद्दीतील लोहियानगरमध्ये हा प्रकार घडला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
नेमकी काय घडली घटना?
बुधवार (दि. ०६ ऑगस्ट २०२५) रोजी सायंकाळी ४:०० वाजण्याच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. लोहियानगर येथील गल्ली नंबर ३, इनामके मळा येथे हा प्रकार घडला.
एका महिला फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा भाऊ सागर राजू अवघडे (वय ३३, रा. लोहियानगर, पुणे) याच्या मामाचा मुलगा सुरज नंदू सकट (वय २५, रा. लोहियानगर, पुणे) याने सागरकडे गाडीची चावी मागितली. सागरने त्याला चावी देण्यास नकार दिला.
या क्षुल्लक कारणावरून सुरजला प्रचंड राग आला. त्याने सागरवर नाका-तोंडावर बुक्क्यांनी जबर मारहाण केली. मारहाणीत सागर खाली पडला. त्यानंतरही सुरजने त्याला मारहाण करणे सुरूच ठेवले. या मारहाणीत सागरचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पोलिसांची कारवाई
या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४१०/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) नुसार आरोपी सुरज नंदू सकट याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी सुरज सकट याला अटक केली आहे.
गाडीच्या चावीसारख्या क्षुल्लक कारणावरून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याचे या घटनेतून दिसून येत आहे.