पुणे, ०८ ऑगस्ट २०२५: खराडी परिसरात एका कंपनीच्या जागेवर जाऊन काही तरुणांनी दहशत माजवली. त्यांनी सिक्युरिटी हेडला शिवीगाळ करून, धमकावले आणि ५ लाख रुपयांची खंडणी मागितली. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे, तर इतरांचा शोध सुरू आहे.
नेमकी काय घडली घटना?
मंगळवार (दि. ०५ ऑगस्ट २०२५) रोजी सायंकाळी ५:२० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. खराडी येथील सर्व्हे नं. ४२ मधील 'इव्हॉन खराडी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.' (Eon Kharadi Infrastructure Pvt. Ltd.) या कंपनीच्या कंपाऊंड गेटसमोर हा प्रकार घडला.
फिर्यादी (वय ५१, रा. सिंहगड रोड, पुणे) हे या कंपनीचे सिक्युरिटी हेड म्हणून कार्यरत आहेत. आरोपी राजू तुकाराम अस्वले (वय २७), हिमेश सुभाष मोरे (वय १८), आकाश संजय मोरे (वय २४), अंकुश अशोक अडसुळ (वय २८) आणि त्यांचे इतर सहा साथीदार बेकायदेशीरपणे या ठिकाणी आले.
त्यांनी मोठ्याने आरडाओरडा करून परिसरात दहशत निर्माण केली. त्यांनी कंपनीच्या कंपाऊंडमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. तसेच, त्यांनी सिक्युरिटी हेडला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्याकडे ५ लाख रुपयांची खंडणी मागितली.
पोलिसांची कारवाई
या प्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. १६६/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३०८ (२) (३) (४), १८९, १८९ (२), १९०, १९१, ३२९ (१) (३), ११५ (२), ३५१ (२), ३५२, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट कलम ३ व ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत वरील चार आरोपींना अटक केली आहे. उर्वरित सहा आरोपींचा शोध सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अशाप्रकारे कंपनीच्या जागेत घुसून खंडणी मागणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.