पिकअप गाडी दरीत कोसळून भीषण अपघात; १० महिलांचा मृत्यू, चालक अटकेत
खेड, पुणे: पापळवाडी ते कुंडेश्वर महादेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक भीषण अपघात झाला आहे. प्रवाशांनी भरलेली पिकअप गाडी दरीत कोसळल्याने १० महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पिकअप चालकाला अटक केली आहे.
काय घडलं?
११ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२:३० वाजता ही दुर्घटना घडली. पापळवाडी येथील २१ वर्षीय तरुणी सिध्दीका रामदास चोरघे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. आरोपी ऋषिकेश रामदास करंडे (वय २५, रा. पापळवाडी) हा त्याच्या ताब्यातील एम.एस. १४/जी.डी. ७२९९ क्रमांकाच्या पिकअप गाडीतून महिला व लहान मुलांना घेऊन कुंडेश्वर मंदिराकडे जात होता.
ही गाडी मालवाहतुकीसाठी परवानाधारक असताना, आरोपीने त्यात दाटीवाटीने प्रवासी भरले होते. तीव्र चढणीच्या आणि वळणावळणाच्या घाटातून गाडी नेत असताना, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडी मागे घसरत जाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या २५ ते ३० फूट खोल दरीत कोसळली.
१० महिलांचा जागीच मृत्यू
या भीषण अपघातात १० महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मयत झालेल्यांमध्ये शारदा रामदास चोरघे (४०), शोभा ज्ञानेश्वर पापळ (४५), सुमन काळुराम पापळ (४७), मंदा कानिफ दरेकर (५५), संजिवनी उर्फ संजाबाई कैलास दरेकर (५०), मिराबाई संभाजी चोरघे (५०), बायडाबाई ज्ञानेश्वर दरेकर (६५), शकुंतला उर्फ सखुबाई तानाजी चोरघे (५५), पार्वताबाई दत्तु पापळ (५५) आणि फसाबाई प्रभु सावंत (५५) यांचा समावेश आहे. या सर्व महिला पापळवाडी येथील रहिवासी आहेत.
या अपघातात अनेक लहान मुले आणि इतर महिलाही जखमी झाल्या असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चालकावर गुन्हा दाखल, अटक
या दुर्घटनेनंतर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी तातडीने कारवाई करत चालक ऋषिकेश करंडे याला अटक केली आहे. त्याच्याविरोधात भा. न्या. सं. कायदा कलम १०५, २८१, १२५ (ए), १२५ (बी), मोटार वाहन कायदा कलम ६६(१)/१९२ (ए), १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून, अशा प्रकारे धोकादायक परिस्थितीत प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.