शहरातून एका मोठ्या आर्थिक फसवणुकीचे प्रकरण समोर आले आहे. एका विद्युत ठेकेदाराला मोठ्या कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मालकाने सुमारे ८६ लाख ४४ हजार २१९ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपळे गुरव येथील 'इंगवले पाटील कन्स्ट्रक्शन कंपनी' विरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रचित बाळासाहेब इंगवले (आरोपी) आणि संदेश निवृती थिटे (फिर्यादी) अशी या प्रकरणातील प्रमुख व्यक्तींची नावे आहेत. आरोपीने कामाचे पैसे देण्यास नकार देत धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार दि. १३ नोव्हेंबर २०२१ पासून आजपर्यंत में. इंगवले पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीच्या पत्त्यावर घडत आहे. फिर्यादी संदेश थिटे यांची 'मिहीर एन्टरप्रायजेस' नावाची विद्युत ठेकेदारीची कंपनी आहे. त्यांना प्रचित इंगवले यांच्या 'इंगवले पाटील कन्स्ट्रक्शन कंपनी'ने भोसरीतील प्रभाग क्र. ७ मधील बापुजी बुवा चौक ते पी.एम.टी. चोकापर्यंतच्या रस्त्याच्या विद्युतविषयक कामाची वर्क ऑर्डर दिली होती. संदेश थिटे यांनी हे काम वेळेत आणि विहित मुदतीत पूर्ण केले. या कामासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने त्यांना पूर्णत्वाचा दाखलाही दिला होता.
त्यानंतर फिर्यादी संदेश थिटे यांनी त्यांच्या कामाची बिले महानगरपालिकेत जमा केली. ही बिले एकूण १ कोटी ९९ लाख ९३ हजार १४५ रुपये इतक्या रकमेची होती आणि ती रक्कम में. इंगवले पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीच्या बँक खात्यावर जमा झाली होती. परंतु, इंगवले पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीने फिर्यादी संदेश थिटे यांना फक्त ६३ लाख १२ हजार ४२३ रुपये एवढीच रक्कम दिली. त्यामुळे फिर्यादीचे उर्वरित ८६ लाख ४४ हजार २१९ रुपये आरोपी प्रचित इंगवले यांनी दिले नाहीत.
जेव्हा संदेश थिटे यांनी याबाबत आरोपी प्रचित इंगवले यांच्याकडे विचारणा केली, तेव्हा प्रचित इंगवले यांनी त्यांना उडवाउडवीचे उत्तर देत धमकी दिली. 'तू जीएसटी वेळेवर भरली नाहीस, मी तुझी रक्कम तुला देणार नाही, तुला काय करायचे ते कर आणि माझी कोठेही तक्रार कर, मी कोणालाही घाबरत नाही,' असे आरोपीने धमकावले. या प्रकारे आरोपीने फिर्यादीची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी भा.न.सं. (BNS) च्या कलम ३१८ (४), ३१६ (२), ३५१ (२), ३ (५) अंतर्गत दि. १४ मे २०२५ रोजी पहाटे ३ वाजून १६ मिनिटांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात आरोपी प्रचित इंगवले यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत. या घटनेमुळे ठेकेदार आणि बांधकाम व्यावसायिकांमधील व्यवहारांमध्ये पारदर्शकतेची आणि कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.