
मद्यधुंद कारचालकाची दुचाकीला धडक; तरुण गंभीर जखमी, आरोपी फरार
पुणे: बावधन परिसरात एका मद्यधुंद कारचालकाने भरधाव वेगात येऊन दुचाकीला धडक दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला असून, आरोपी कारचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
११ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १:१५ वाजताच्या सुमारास बाणेर येथील बीटवाईज चौकात ही घटना घडली. याप्रकरणी एका महिलेने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, त्यांचा भाऊ अक्षय हा पिंपळे निलख येथे त्याच्या मित्राला भेटून परत येत होता.
अक्षय त्याच्या बीएमडब्ल्यू दुचाकीवरून (एम.एच. १४/जे.डब्लू. ९७००) जात असताना, समोरून आलेल्या हुंडई आय-२० कारने (एम.एच. ०९/सी.एल. ५३५५) त्याला जोरदार धडक दिली. ही कार आरोपी पार्थ प्रकाश पाटील (वय ३२) चालवत होता.
मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवत होता
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पाटील हा मद्यधुंद अवस्थेत होता. त्याने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे गाडी चालवली, ज्यामुळे हा अपघात घडला. धडकेमुळे अक्षयच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून, तो डाव्या डोळ्याच्या वरील कपाळावर गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाला.
आरोपी फरार
अपघात घडल्यानंतर आरोपी पार्थ पाटील घटनास्थळी न थांबता पळून गेला. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला असून, भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब), ३२४ (४) आणि मोटार वाहन कायदा कलम ११९/१७७, १८५ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.