पालघरमध्ये अघोरी विद्येचा धक्कादायक प्रकार उघडकीस; गावात भीतीचे वातावरण
पालघर: पालघर जिल्ह्यातील सातिवली गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका निर्जनस्थळी अघोरी पूजा करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, स्थानिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.
नेमकं काय आढळलं?
गावातील एका निर्जनस्थळी काही स्थानिकांना अघोरी पूजेचे साहित्य आढळून आले. यामध्ये पिठाची बाहुली, लिंबू, चाकू, पांढरी टोपी, बिडी, सिगारेट, कोंबड्याची पिसे, अबीर, गुलाल आणि अगरबत्ती आदींचा समावेश होता. हे साहित्य पाहिल्यानंतर हा प्रकार अघोरी विद्येशी संबंधित असल्याचा संशय बळावला आहे.
पुजारी फरार
ही घटना समोर आल्यानंतर काही वेळातच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली. मात्र, पूजा करणारा तो अज्ञात पुजारी घटनास्थळावरून पसार झाल्याचे दिसून आले. स्थानिकांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असून, पुढील तपास सुरू आहे.
अंधश्रद्धा आणि जादूटोण्याच्या नावाखाली असे प्रकार आजही घडत असल्यामुळे, नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत असून, अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी पावले उचलण्याची मागणी होत आहे.