पुणे, ३ सप्टेंबर: पार्किंगच्या जागेवरून सुरू झालेल्या जुन्या वादातून चुलत्याने पुतण्यावर फावड्याने प्राणघातक हल्ला (Attack) केल्याची धक्कादायक घटना देहुरोड परिसरातील समर्थ नगरी, निगडी येथे घडली आहे. या हल्ल्यात पुतण्या गंभीर जखमी झाला असून, आरोपी चुलत्याला पोलिसांनी अटक केली आहे.
गुन्ह्याचा तपशील:
हा प्रकार १ सप्टेंबर, २०२५ रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ग्लोबल अँड गुरुदत्त पे अॅड पार्किंगमध्ये घडला. फिर्यादी महेश ज्ञानोबा काळभोर (वय ३५) यांनी देहूरोड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे चुलते तुकाराम सखाराम काळभोर (वय ६०) यांनी फिर्यादीच्या कामगाराला शिवीगाळ केली. पार्किंग समोरील गोठा ते मंदिरादरम्यान गाड्या पार्क न करण्याच्या कारणावरून हा वाद सुरू झाला.
या वादाबाबत जाब विचारण्यासाठी फिर्यादीचा भाऊ तिथे गेला असता, आरोपी तुकाराम काळभोरने जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्याच्यावर लाकडी दांडका असलेल्या लोखंडी फावड्याने हल्ला केला. यात फिर्यादीच्या भावाच्या डाव्या डोळ्याच्या भुवईवर गंभीर दुखापत झाली आहे. आरोपीने त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि "तुम्हाला सगळ्यांना जिवंत सोडणार नाही" अशी धमकी देऊन तो निघून गेला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी तुकाराम सखाराम काळभोरला अटक केली आहे. देहूरोड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९(१), ३५१(२), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक डोंगळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.