पुणे, ३ सप्टेंबर: गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच गणपती वर्गणीच्या नावाखाली खंडणी (Extortion) मागणाऱ्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. पिंपळे सौदागर येथील एका लॉजिंगच्या व्यवस्थापकाला धमकावून त्याच्याकडून १,२०० रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी काळेवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.Extortion again in the name of Ganpati subscription
गुन्ह्याचा तपशील:
ही घटना ३० ऑगस्ट, २०२५ रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील साईदीप लॉजिंग, जगताप डेअरी चौकात घडली. फिर्यादी अखिलेश कुमार महाविर गौतम (वय २५), जे लॉजिंगचे व्यवस्थापक आहेत, यांनी काळेवाडी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, तीन अनोळखी व्यक्ती त्यांच्याकडे आल्या. त्यांनी गणपती वर्गणी म्हणून ५,००० रुपयांची मागणी केली. आरोपींनी ‘गणपती वर्गणी’च्या नावाखाली एक पावती बुक दिले आणि त्यातील १,२०० रुपयांची पावती फिर्यादीला दिली. तसेच, त्यांनी फोन पे (Phonepe) द्वारे ८००७३२०१८३ या नंबरवर पैसे पाठवण्यास सांगितले.
यावेळी, आरोपींनी फिर्यादीला धमकावले की, “जर पैसे दिले नाहीत, तर बघून घेऊ” आणि “उद्या पुन्हा याच वेळेला परत येऊ.” या धमक्यांमुळे घाबरून फिर्यादीने त्यांना १,२०० रुपये रोख दिले.
या प्रकरणी, काळेवाडी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०८ (२), ३०८ (३), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक मुजावर या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपी अद्याप फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. गणपती उत्सवाच्या काळात अशा प्रकारे होणाऱ्या गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.