पुणे: मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे एका हॉटेलमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. पैशाच्या वादातून एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला मारहाण केली, पैसे हिसकावून घेतले आणि भर चौकात कोयता फिरवून दहशत निर्माण केली. पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
काय घडले नेमके? ही घटना २२ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील सोमाटणे फाट्यावरील आदित्य हॉटेल चौराई नगर येथे घडली. फिर्यादी स्वप्नील अरुण लांडे (वय ३५, इस्टेट एजंट) हे त्यांचा मित्र सुनील चव्हाण यांच्यासोबत जेवण करण्यासाठी बसले होते.
त्याचवेळी आरोपी मयूर सुहास मु-हे (वय ३३, रा. सोमाटणे गावठाण) तिथे आला. मयूरने स्वप्नीलला 'मोपेड स्कुटर क्रमांक एमएच १२ बीएच ९७९२ च्या बदल्यात उसने घेतलेले पैसे अद्याप दिले नाहीत' असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्याने मयूरने स्वप्नीलला हाताने मारहाण केली.
कोयता फिरवून दहशत आणि धमकी मारहाणीनंतर, मयूरने स्वप्नीलच्या शर्टच्या खिशातील ३,००० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. एवढ्यावरच न थांबता, त्याने आपल्या कमरेला खोचलेला कोयता बाहेर काढून हवेत फिरवला आणि 'मला दोन दिवसांत राहिलेले पैसे मिळाले नाहीत, तर जिवंत सोडणार नाही' अशी धमकी दिली. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आणि त्यानंतर मयूर घटनास्थळावरून निघून गेला.
पोलिसांकडून तात्काळ कारवाई या गंभीर घटनेनंतर, २३ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री १०:१५ वाजता तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी मयूर सुहास मु-हे याला अटक केली आहे. त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६), ३५१ (३), ३५२ सह फौजदारी सुधारणा कायदा कलम ३, ७, भारतीय हत्यार कायदा ४/२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोउपनि मोहारे (मो. ७९७२३३६२७०) हे या प्रकरणाचा तपास करत आहेत. सार्वजनिक ठिकाणी अशी कृत्ये करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.