पिंपळे गुरवमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणाची निर्घृण हत्या; चर्चेच्या बहाण्याने बोलावून ११ जणांचा सामूहिक हल्ला, ९ आरोपींना अटक । Young man brutally murdered over love affair in Pimple Gurav
पुणे: प्रेमसंबंधाच्या वादातून पुण्यात एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चर्चेच्या नावाखाली तरुणाला एका घरात बोलावून ११ जणांच्या टोळक्याने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली आहे.
ही घटना दि. २२/०७/२०२५ रोजी रात्री ८ ते १० वाजण्याच्या दरम्यान पिंपळे गुरव येथील एका घरात घडली. फिर्यादी रवि किसन घेगट यांचा मुलगा रामेश्वर घेगट (वय २६) याचे आरोपी सुरेंद्र सारसर यांच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. याच कारणावरून आरोपी सुरेंद्र सारसरने फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबाला चर्चेसाठी आरोपी नवीन दशरथ पेवाल यांच्या घरी बोलावले.
चर्चेच्या बहाण्याने घरात बोलावल्यानंतर, सर्व आरोपींनी रामेश्वरला घरात जबरदस्तीने ओढून नेले. त्यांनी दरवाजा आतून बंद करून त्याचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर, आरोपींनी मिळून रामेश्वरला लाथा-बुक्क्यांनी आणि बेल्टने बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, त्यांनी दोरीने त्याचा गळा आवळला आणि त्याच्या अवघड जागी लाथा मारून त्याला गंभीर जखमी केले. या हल्ल्यानंतर रामेश्वरला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तातडीने तपास करत ११ पैकी ९ आरोपींना अटक केली आहे. उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.