मावळात अवैध हातभट्टीवर छापा; तब्बल २२०० लिटर कच्चे रसायन जप्त! Raid on illegal hand kiln in Maval
पुणे: ग्रामीण भागात अवैध दारूविक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. मावळ तालुक्यातील दास्ग्रेगाव येथे पोलिसांनी छापा टाकून मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारूचे कच्चे रसायन जप्त केले आहे. पोलिसांची चाहुल लागताच आरोपी महिला घटनास्थळावरून फरार झाली.
ही कारवाई दि. २३/०८/२०२५ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास दास्ग्रेगाव येथील संत तुकाराम साखर कारखान्याजवळील एका मोकळ्या जागेत करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ३० वर्षीय महिलेने तिच्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तब्बल २२०० लीटर गुळमिश्रीत कच्चे रसायन तयार केले होते. या साहित्याची किंमत सुमारे ७७,००० रुपये आहे.
छापा टाकण्यासाठी पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असताना, आरोपी महिलेला पोलिसांच्या येण्याची जाणीव झाली. त्यामुळे ती झुडपांचा आडोसा घेऊन पळून गेली.
या प्रकरणी पोलीस शिपाई जाधवर यांनी फिर्याद दिली असून, शिरगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रोव्हि कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार बांगर हे फरार आरोपी महिलेचा शोध घेत आहेत.