चिखलीत 'रावण गँग'च्या नावाने बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी; १ लाखाचा हप्ता न दिल्यास दगड मारून जीवे ठार मारण्याची धमकी
पिंपरी-चिंचवड: शहरालगतच्या चिखली परिसरात खंडणीसाठी एका बांधकाम व्यावसायिकावर हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वत:ला 'रावण गँग'चा सदस्य म्हणवून घेणाऱ्या एका आरोपीने व्यावसायिकाकडे दरमहा १ लाख रुपयांच्या हप्त्याची मागणी केली. व्यावसायिकाने नकार दिल्यानंतर आरोपीने दगड मारून त्याला जखमी केले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे.
हा प्रकार दि. २६/०८/२०२५ रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास चिखली येथील तुळजाई कॉम्प्लेक्ससमोर घडला. फिर्यादी शरद प्रभाकर ताम्हाणे (वय ३१) हे त्यांच्या घरासमोर उभे असताना, आरोपी निखिल दिलीप भागवत आणि त्याच्यासोबत असलेल्या काजल नावाच्या महिलेने त्यांच्याजवळ येऊन, 'जर तुम्हाला तुमचा व्यवसाय व्यवस्थित करायचा असेल, तर आम्हाला दर महिन्याला १,००,०००/- रुपये हप्ता द्यावा लागेल', अशी मागणी केली.
फिर्यादीने त्यांना नकार देऊन निघून जायला सांगितल्यावर, आरोपी निखिल भागवतने शिवीगाळ करत दगडाने त्यांच्यावर हल्ला केला. तसेच, 'मी रावण गँगचा सदस्य आहे, जर कोणी मध्ये येईल तर त्याचा जीव घेईन', अशी धमकीही दिली.
या प्रकरणी फिर्यादीने तात्काळ तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी वेगाने कारवाई केली. चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी मुख्य आरोपी निखिल दिलीप भागवत याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक गोमारे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अशा गुंडांच्या टोळ्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.