पुणे, ७ सप्टेंबर: पिंपरी-चिंचवडमधील चिखली (Chikhli) येथे 'भाई'गिरी करणाऱ्या एका टोळक्याने ‘तू माझा फोन का उचलला नाहीस?’ या क्षुल्लक कारणावरून एका तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. हल्लेखोरांनी त्याला लाकडी दांडक्याने मारहाण करून त्याचे बोट फ्रॅक्चर केले. चिखली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चार आरोपींना अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
ही घटना ५ सप्टेंबर, २०२५ रोजी पहाटे १.३० वाजताच्या सुमारास जाधववाडी, चिखली येथील मळेकर गल्ली क्रमांक ९ मध्ये घडली. फिर्यादी सौरभ संतोष पाटील (वय २१) यांनी चिखली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी एका गणेश मंडळाचा कार्यकर्ता आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आदित्य उर्फ छोट्या राजू सोनवणे (वय २१) आपल्या मित्रांसह फिर्यादीच्या मंडपाजवळ आला. त्याने सौरभला, “तू माझा फोन का उचलला नाहीस? तुला जास्त मस्ती आली आहे,” असे म्हणून शिवीगाळ केली. “आम्ही इथले भाई आहोत, तू आमचे ऐकले पाहिजे,” असे धमकावत त्याने मंडळाजवळ पडलेले लाकडी दांडके उचलून सौरभच्या डाव्या हाताच्या बोटावर आणि उजव्या हाताच्या दंडावर मारले. यामुळे सौरभच्या डाव्या हाताचे बोट फ्रॅक्चर झाले आणि त्याला गंभीर दुखापत झाली.
यावेळी, आरोपींचे इतर साथीदार तेजस लामतुरे, विशाल सोनवणे, अथर्व मळेकर आणि रवी घोगरे यांनीही सौरभला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी काही लोक येत असताना आरोपींनी त्यांनाही, “आम्ही इथले भाई आहोत, मध्ये पडल्यास तुम्हालाही मारून टाकू,” अशी धमकी देऊन परिसरात दहशत निर्माण केली.
पोलिसांची कारवाई
याप्रकरणी, पोलिसांनी आरोपी आदित्य सोनवणे, तेजस लामतुरे, विशाल सोनवणे आणि अथर्व मळेकर यांना अटक केली आहे. पाचवा आरोपी रवी घोगरे अद्याप फरार आहे. आरोपींवर चिखली पो.स्टे. गु.र.नं. ५५७/२०२५ नुसार भा.न्या.सं.क. ११८(२), ११५(२), ३५२, १८९(२), १८९(३), १९०, १९१(२) आणि क्रिमिनल लॉ अॅमेंटमेंट कलम ३, ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मासाळ या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.