पुणे शहरात गुन्हेगारीविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले असून, रेकॉर्डवरील आरोपी श्वेतांग भास्कर निकाळजे याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासोबत ओम संजय गायकवाड यालाही अटक करण्यात आली आहे. या कारवाईत त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दोन अग्नीशस्त्र आणि चारचाकी वाहन असा सुमारे ६ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एका गंभीर धमकावणे, अपहरण आणि खंडणीच्या प्रयत्नाप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे, ज्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ०८ नोव्हेंबर २०२५ रोजी ११:४५ वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. फिर्यादी त्यांच्या राहत्या घराच्या पार्कींगमधून जात असताना, आरोपी श्वेतांग निकाळजे आणि त्याचे साथीदार यांनी त्यांना लग्न न करण्याच्या आणि एअरटेल टॉवरच्या कराराचे पैसे देण्याच्या उद्देशाने जबरदस्तीने त्यांच्या चारचाकी गाडीत बसवून घेतले. त्यांना भोर रोडवर नेऊन, आरोपी श्वेतांग निकाळजेने फिर्यादीच्या डोक्यावर दोन पिस्तुल ठेवून 'तुला कोणत्या पिस्तुलमधून गोळी घालू' अशी गंभीर धमकी दिली. याच वेळी इतर दोन साथीदारांनी 'तू भाऊचे ऐकत नाहीस, तुझ्या डोक्यात कोयता टाकतो' असे धमकावले.
कसाबसा आरोपींच्या तावडीतून पळून गेल्यानंतर, फिर्यादीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. यानंतर आरोपींनी फिर्यादी पळून गेल्याच्या रागातून त्याच्या मित्राला शिवाजीनगर येथे नेऊन मारहाण केली आणि पिस्तुल लावून पुन्हा धमकावले. या तक्रारीवरून, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. ५०७/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १४०(२), १२७(२), ३५१(३), ३५२, ३(५), भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३०(९)(३), १३५ अंतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश पवार, मंगेश गायकवाड, किरण साबळे, अभिनय चौधरी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी त्वरित कार्यवाही करत आरोपी श्वेतांग भास्कर निकाळजे (वय ३७, रा. मंगळवार पेठ, पुणे) आणि ओम संजय गायकवाड (वय २६) यांना दि. २० नोव्हेंबर २०२५ रोजी अटक केली. अटक केलेल्या आरोपींकडे अधिक तपास केला असता, आरोपी क्रमांक ०१ श्वेतांग निकाळजे याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दोन अग्नीशस्त्रे आणि गुन्ह्यासाठी वापरलेली चारचाकी गाडी असा एकूण ६ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, पोलिसांनी यामागील इतर सूत्रधार आणि साथीदारांचा शोध घेण्यासाठी मोहीम तीव्र केली आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ २, पुणे शहर, श्री. मिलींद मोहीते, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे शहर, श्री. राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली, भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे यांच्या सूचनेप्रमाणे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, मंगेश गायकवाड, किरण साबळे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार व संदीप आगळे यांनी यशस्वीपणे पार पाडली. या कारवाईमुळे पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल कटिबद्ध असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.