पुणे, ३ सप्टेंबर: पुणे-बाणेर येथील शिंदे मळा येथे गणेश मंडळाच्या वादातून एका व्यक्तीने वडील आणि मुलावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला असून, बाणेर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. गणेशोत्सवाच्या काळात अशा घटनांमुळे शांतता आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.Shinde Mala in Baner
गुन्ह्याचा तपशील:
हा प्रकार १ सप्टेंबर, २०२५ रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास बाणेरमधील विघ्नहर्ता गणेश मंडळ, अर्जुन शिंदे यांच्या चाळीत घडला. या प्रकरणी एका ४६ वर्षीय व्यक्तीने बाणेर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मुलगा त्या ठिकाणी थांबले होते. त्याचवेळी आरोपी रवी त्र्यंबक घोरपडे आणि ओंकार उर्फ सोन्या राजेश मोरे भांडणाच्या जुन्या कारणावरून चिडून तेथे आले.
त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करत हाताने आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. आरोपींनी फिर्यादीवर हल्ला करण्यासाठी हत्यारांचा वापर करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा फिर्यादीचा मुलगा मध्ये पडला. या हल्ल्यात मुलाला गंभीर दुखापत झाली आहे.
या प्रकरणी, बाणेर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:
रवी त्र्यंबक घोरपडे (वय ४५, रा. बाणेर, पुणे)
ओंकार उर्फ सोन्या राजेश मोरे (वय १९, रा. बाणेर, पुणे)
पोलिसांनी या आरोपींवर बाणेर पो.स्टे. गु.र.नं. २०२/२०२५, भा.न्या.सं.क. ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२, ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार शिरसाट या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.