पुणे, भोसरी (Bhosari News): पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात ऑनलाइन फसवणुकीचे (Online Fraud) गुन्हे वाढत असतानाच, भोसरी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हॉटेलला रेटिंग देण्याचे टास्क (Task) पूर्ण करण्याच्या बहाण्याने एका ग्राफिक डिझायनर महिलेची तब्बल २ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस स्टेशनमध्ये (Bhosari Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.
नेमकी घटना काय?
ही घटना २१ जून ते २४ जून २०२५ या कालावधीत घडली. भोसरी येथे राहणाऱ्या एका ३१ वर्षीय ग्राफिक डिझायनर महिलेला एका अनोळखी व्यक्तीने या मोबाईल नंबरवरून टेलिग्राम (Telegram) ॲपवर ॲड केले. @Pabati1481 या यूजर आयडी असलेल्या या व्यक्तीने महिलेला हॉटेल आणि रेस्टॉरंटला ५ स्टार रेटिंग देऊन त्याचे स्क्रीनशॉट पाठवण्यास सांगितले.
सुरवातीला या टास्कचे पैसे ट्रान्सफर करून आरोपीने महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, आरोपीने बिटकॉईनमध्ये (Bitcoin) ट्रेडिंग करून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून महिलेने वेगवेगळ्या ९ ट्रान्झॅक्शन्सद्वारे एकूण १,१२,०४० रुपये पाठवले.
फसवणुकीतून वाचवण्याच्या नावाखाली पुन्हा गंडा
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने गुगलवर (Google) सायबर फसवणुकीतून पैसे परत मिळवण्यासाठी मदत शोधली. त्यावेळी तिला ८३६८०१३१८० हा मोबाईल नंबर मिळाला. या नंबरवर संपर्क केल्यावर फोनवरील व्यक्तीने स्वतःला 'एन.पी.सी.आय.चे गव्हर्नमेंट अधिकारी' असल्याचे सांगितले.
त्या व्यक्तीने महिलेला 'हफगफहत्तफ्युररतू हा युपीआय आयडी (UPI ID) तयार करण्यास सांगून त्यावर ८८,०८० रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. पैसे परत मिळवण्याच्या आशेने महिलेने ही रक्कम पाठवली. मात्र, त्यानंतर तिचा संपर्क तुटला आणि तिला पुन्हा फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अशा प्रकारे तिची एकूण २,००,१२० रुपयांची आर्थिक फसवणूक झाली.