Pune: इमारतीवर काम करत असताना, हायटेन्शन वायरचा धक्का लागून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू


पुणे, ०५ ऑगस्ट २०२५:
फुरसुंगी येथील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर काम करत असताना, हायटेन्शन वायरचा धक्का लागून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. बांधकाम व्यावसायिकाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप असून, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नेमकी काय घडली घटना?

शनिवारी (दि. २६ जुलै २०२५) सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फुरसुंगीतील हरपळे वस्ती, भेकराई माता मंदिराशेजारी, सर्व्हे नं. १७१/८/१, लेन नं. ०२ येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू होते.

पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीवरून दोन विजेच्या टॉवर्सना जोडणारी हायटेन्शन वायर गेली होती. तिचा धक्का लागून जीवितहानी होऊ शकते, याची बांधकाम व्यावसायिकाला पूर्ण जाणीव होती. तरीही, त्याने तेथे काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेसाठी कोणतेही वीजरोधक उपकरणे (इन्सुलेटेड टूल्स) पुरवली नाहीत.

याच निष्काळजीपणामुणामुळे, कामगार पवन दित्या नायक (वय ३३, रा. मध्यप्रदेश) याच्या हातातील ओला बांबू इमारतीच्या वरून जाणाऱ्या हायटेन्शन वायरला लागला. त्याला विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. डॉक्टरांनी तपासणी करण्यापूर्वीच तो मृत झाल्याचे घोषित करण्यात आले.


पोलिसांची कारवाई

या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात गु.र.नं. २४०/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम १०६ आणि २९० नुसार बांधकाम व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधकाम व्यावसायिक फरार असून त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

फुरसुंगी पोलीस ठाण्यात या घटनेची अ.मयत (अकस्मात मृत्यू) रजि.नं. ८७/२०२५ नोंदविण्यात आली होती. तपासाअंती, बांधकाम व्यावसायिकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामगारांच्या जीवाशी असा निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post