पुणे, ०६ ऑगस्ट २०२५: सहकारनगर परिसरात मध्यरात्री 'भाईगिरी'चा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैशांच्या वादातून एका तरुणाला धमकी देत, काही हल्लेखोरांनी लोखंडी हत्यारे घेऊन परिसरात दहशत निर्माण केली. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
नेमकी काय घडली घटना?
सोमवार (दि. ०४ ऑगस्ट २०२५) रोजी पहाटे ३:५० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शंकर महाराज वसाहतीतील श्रीराम सुपरमार्केट शेजारी, दत्त मंदिराजवळ हा प्रकार घडला.
फिर्यादी महिला (वय ३७, रा. शंकर महाराज वसाहत, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी रोहन सचिन यादव (वय २२, रा. धनकवडी, पुणे) आणि अंगद अशोक साठे (वय २०, रा. आंबेगाव पठार, पुणे) यांनी त्यांच्या मुलाला धमकी दिली. त्यांच्या पतीने घेतलेले पैसे परत देण्याच्या कारणावरून हा वाद सुरू होता.
याच वादातून आरोपी रोहन यादव आणि अंगद साठे आपल्यासोबत एक विधीसंघर्षित बालक आणि इतर चार साथीदारांना घेऊन घटनास्थळी आले. त्यांनी हातात लोखंडी हत्यारे घेऊन वस्तीत मोठमोठ्याने आरडाओरडा करत परिसरात दहशत निर्माण केली.
पोलिसांची कारवाई
या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३१४/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम १८९ (१), १८९ (२), १८९ (४), १९१ (१) (२) (३), १९०, ३३३, ३५१ (७)(३), ३(४), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१), १३५, आर्म्स ॲक्ट कलम ४(२५), आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी रोहन सचिन यादव आणि अंगद अशोक साठे यांना अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. मध्यरात्री झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.