पुणे, वाकड (Wakad News): पुणे शहराच्या वाकड परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. नोकरी न लागणे, माहेराहून फर्निचरसाठी पैसे न आणणे आणि मूलबाळ न होणे यांसारख्या कारणांवरून एका विवाहितेला तिच्या सासरच्या मंडळींनी शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. या छळाला कंटाळून त्या महिलेने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी (Wakad Police) पती आणि सासऱ्याला अटक केली आहे.Married woman ends life by hanging herself
ही घटना जून २०२२ पासून १८ ऑगस्ट २०२५ पर्यंत घडली आहे. फिर्यादी देवेंद्र भाऊसाहेब खैरनार यांनी या संदर्भात वाकड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी यांची बहीण, मयत दिव्या सूर्यवंशी, हिचा पती हर्षल सूर्यवंशी, सासू, सासरे शांताराम सूर्यवंशी, जेठ योगेश सूर्यवंशी आणि नणंद या सर्व आरोपींनी मिळून तिला त्रास दिला.
नेमका छळ कशासाठी?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर काही कालावधीतच आरोपींनी दिव्याचा छळ सुरू केला. तिला नोकरी मिळत नसल्यामुळे, तसेच माहेराहून फर्निचरसाठी पैसे आणले नाहीत या कारणांवरून तिला वारंवार टोमणे मारले जात होते. सर्वात गंभीर बाब म्हणजे, लग्नानंतर मूलबाळ झाले नाही यावरूनही तिचा छळ केला जात होता.
आरोपींनी वेळोवेळी दिव्याला मारहाण करून आणि मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले, असे फिर्यादींनी तक्रारीत म्हटले आहे. या सततच्या छळाला कंटाळून अखेर दिव्याने १८ ऑगस्ट रोजी दुपारी १ ते सायंकाळी ७ च्या दरम्यान वाकड येथील तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
पोलिसांची कारवाई
या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी पती हर्षल सूर्यवंशी आणि सासरे शांताराम सूर्यवंशी यांना अटक केली आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०८, ८०, ८५, ११५ (२), ३ (५) तसेच हुंडाबळी अधिनियम कलम ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बाबासो चव्हाण करत आहेत.