पुणे, निगडी: पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले असून, गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती राहिली नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. चिंचवड येथील अजिंठानगरमध्ये एका तरुणाला तलवारीचा धाक दाखवून त्याच्या खिशातून १ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेण्यात आले. या वेळी मध्ये आलेल्या तरुणाच्या आईलाही मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.Terror by showing sword in Chinchwad
नेमकी घटना काय?
ही घटना २० ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८.०५ वाजण्याच्या सुमारास अजिंठानगर, चिंचवड येथील एका पाच मजली इमारतीच्या पार्किंगमध्ये घडली. फिर्यादी मयुर सुनील क्षेत्रे (वय २८), हे आपल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये असताना, आरोपी प्रतीक कैलास गजरमल, दोन अल्पवयीन मुले (विधिसंघर्षित बालक) आणि त्याचे तीन मित्र तिथे आले.
या आरोपींनी मयुर क्षेत्राकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मयूरने पैसे देण्यास नकार दिल्यावर आरोपींनी त्याच्या खिशातील १,००० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. या घटनेचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्यावर आरोपी प्रतीकने त्याच्या हातातील लोखंडी तलवार काढली.
आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण
तलवार बघून घाबरलेल्या मयूरने पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्याची आई, सौ. सुरेखा, त्यांना वाचवण्यासाठी पुढे आल्या. आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात त्यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली, तर छातीवरही लाथ मारण्यात आली.
या गंभीर गुन्ह्यानंतरही आरोपी थांबले नाहीत. त्यांनी हातात तलवार घेऊन हवेत फिरवत 'मी इथला भाई आहे' असे ओरडून परिसरात दहशत निर्माण केली आणि घटनास्थळावरून पळ काढला.
पोलिसांची कारवाई
या घटनेनंतर मयूर क्षेत्रे यांनी निगडी पोलीस स्टेशनमध्ये (Nigdi Police Station) तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१० (२), ११५ (२), ३५१ (२), ३५२, भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), क्रिमिनल अॅक्ट ३, ७, आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून, यामध्ये अल्पवयीन आरोपींचाही समावेश असल्याने या गुन्ह्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे.
#PuneNews #Nigdi #Chinchwad #SwordAttack #CrimeNews #PunePolice