भरधाव PMPML बसने दुचाकीस्वाराला चिरडले; १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू, चालक फरार
पुणे: शहराच्या जेलरोड परिसरातील ५०९ चौकाजवळ एका भरधाव PMPML बसने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात १८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. बसचालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचा आरोप असून, चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.PMPML bus crushes biker
नेमकं काय घडलं?
१५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११:१५ वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी राजु राठोड (वय ३५) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, त्यांचा चुलत भाऊ रवि शंकर राठोड (वय १८) हा त्याच्या मोटारसायकलवरून जात असताना, समोरून येणाऱ्या PMPML बसने त्याला जोरदार धडक दिली.
निष्काळजीपणाने चालवल्याने अपघात
बसचालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून, निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने बस चालवली. याच बेदरकारपणामुळे हा अपघात घडला. धडकेत रवि गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर बसचालक न थांबता पळून गेला.