सुसगावात जमिनीच्या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; आरोपींकडून भयंकर मारहाण
पुणे: मुळशी तालुक्यातील सुसगाव (Land dispute in Susgaon)येथे जमिनीच्या जुन्या वादातून दोन कुटुंबांमध्ये वाद झाला आणि त्याचे रूपांतर एका तरुणावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात झाले. आरोपींनी लाकडी दांडके, कोयता आणि दगडाने हल्ला करत परिसरात दहशत निर्माण केली. हा प्रकार पाहणाऱ्यांचे हृदय थरारले आहे.
नेमकं काय घडलं?
१४ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी दीड वाजता ही घटना सुसगावमधील गट नंबर १७६ मधील जमिनीवर घडली. फिर्यादी ओम अनिल साळुंखे (वय १९) यांचा मामा जीवन चांदेरे आपल्या शेतजमिनीचे सपाटीकरण करत होते. त्याचवेळी माणिक नारायण चांदेरे आणि शांताबाई शेवाळे यांनी येऊन जमीन आपली असल्याचा दावा करत जीवन चांदेरे यांना शिवीगाळ केली आणि काठीने मारहाण केली.
मोबाईल हिसकावून जीवघेणा हल्ला
मारहाणीचा व्हिडिओ काढत असताना, आरोपी मोहन, सतीश आणि संतोष चांदेरे यांनी ओमचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर, त्यांनी ओमला हातातील काठीने त्याच्या पाठीवर, छातीवर आणि हातावर मारहाण केली.
एका आरोपीने कोयत्याने त्याच्या डोक्यावर वार केला, तसेच जमिनीवरील दगड उचलून त्याच्या छातीवर मारला. इतर आरोपींनीही त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात ओम गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.