पुणे: रावेत येथे ‘फ्रेशर पार्टी’च्या पोस्टरवरून वाद झाल्याने एका १७ वर्षीय विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी 'मी इथला भाई आहे' असे धमकावून २५ हजार रुपयांची खंडणी मागितली. या प्रकरणी पोलिसांनी चार अनोळखी तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं काय घडलं?
१३ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १:३० वाजताच्या सुमारास किवळे येथील बुज कॅफेजवळ ही घटना घडली. सोहम बापु दगडे (वय १७, रा. बावधन) हा त्याच्या मित्रांसोबत ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘फ्रेशर पार्टी’ची जाहिरात करण्यासाठी पोस्टर लावत होता.
त्यावेळी, हुसेन डांगे नावाचा तरुण त्याच्या साथीदारांसह तिथे आला आणि त्याने सोहमला धमकावणे सुरू केले. त्याने पोस्टर फाडून टाकले आणि सोहमला म्हणाला, “तुला फ्रेशर पार्टी करायची असेल तर मला २५,००० रुपये द्यावे लागतील. मी इथला भाई आहे, मला पैसे दिल्याशिवाय कोणीही कार्यक्रम करू शकत नाही. जर मला न विचारता कार्यक्रम केलास तर तुला मारून टाकीन.”
लाथा-बुक्क्यांनी मारहाण आणि ३२०० रुपये लंपास
हुसेन डांगे आणि त्याचा साथीदार मियाँ खान यांनी सोहमच्या पोटात आणि डोक्यावर बुक्क्या मारल्या. त्यामुळे सोहमच्या डोक्यावर गाठ आली आणि हाताला खरचटले. त्यानंतर, अमन शेख आणि एका अनोळखी मुलाने सोहमला पकडून ठेवले. त्याचवेळी हुसेनने सोहमच्या पॅन्टच्या खिशातून ३२०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
मारहाण करताना मियाँ खान हा सोहमच्या मित्राला म्हणाला, “याला समजव, आमच्या नादी लागला तर याला कॉलेजच्या गेटवरच तोडीन.” अशी धमकी देऊन ते सर्वजण निघून गेले.
गुन्हा दाखल, आरोपी फरार
या घटनेनंतर सोहम दगडे याने रावेत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी हुसेन डांगे, मियाँ खान, अमन शेख आणि एका अनोळखी मुलावर भारतीय न्याय संहिता कलम ३०८ (१) (३), ३०९ (६), ११५ (२), ३५२, ३५१ आणि इतर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. सध्या सर्व आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.