पुणे: निगडी परिसरात एका ६२ वर्षीय व्यक्तीची बनावट विमा पॉलिसीच्या नावाखाली तब्बल १५ लाख ३३ हजार ७५० रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपींनी 'फ्युचर जनरली लाइफ इन्शुरन्स' (Future Generali Life Insurance) कंपनीचे नाव वापरून ही फसवणूक केली आहे.Fraud in the name of insurance company
नेमकं काय घडलं?
९ जुलै २०२५ ते २३ जुलै २०२५ या कालावधीत हा सायबर गुन्हा घडला. याप्रकरणी चिंचवड येथील एका ६२ वर्षीय व्यक्तीने निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादींना त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी व्हॉट्सअॅप नंबरवरून मेसेज आला.
मेसेजमध्ये 'फ्युचर जनरली लाइफ इन्शुरन्स (HDFC)' कंपनीचा दुसरा हप्ता भरण्यासाठी HDFC बँक खाते क्रमांक ५०२००११०९१०७२० आणि IFSC कोड ०००१७७९ मध्ये RTGS (रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट) प्रीमियम भरावा लागेल, असे म्हटले होते.
दोन टप्प्यात १५ लाखांची फसवणूक
आरोपींनी खोटे मेसेज पाठवून फिर्यादींचा विश्वास जिंकला. आरोपींनी दिलेल्या बँक खात्यात फिर्यादींकडून दोन टप्प्यांत एकूण १५ लाख ३३ हजार ७५० रुपये RTGS द्वारे भरण्यास भाग पाडले. पैसे भरल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.