नवी सांगवी येथे कोयत्याने जीवघेणा हल्ला; 'भाईगिरी' करणाऱ्या ८ तरुणांना अटक
पुणे: नवी सांगवी परिसरात 'भाईगिरी'च्या वादातून एका १७ वर्षीय तरुणावर आणि त्याच्या मित्रावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगवी पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत आठ आरोपींना अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
१४ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १०:०० ते १०:३० च्या दरम्यान नवी सांगवी येथील 'विडा पान सेंटर'समोर ही घटना घडली. फिर्यादी आर्यन ज्ञानदेव गाडेकर (वय १७) हा त्याचा मित्र ईश्वर शिंदे याच्यासोबत 'सैराट बिर्याणी' येथे थांबला होता. त्यावेळी, आरोपींमध्ये आपसात वाद सुरू होता. आरोपींपैकी एकाने आर्यनला त्यांच्यासोबत थांबण्याची विनंती केली. मात्र, 'भांडण करू नका, कोयते काढू नका, नाहीतर पोलीस येतील,' असे सांगून आर्यन आणि त्याचा मित्र तिथून निघून गेले.
याचा राग मनात धरून आरोपींनी आर्यन आणि त्याच्या मित्राचा पाठलाग केला. जेव्हा ते दोघे 'विडा पानटपरी'वर पान खाण्यासाठी थांबले, तेव्हा आरोपींनी पुन्हा त्यांना गाठले. आरोपींनी शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या उद्देशाने आर्यन आणि ईश्वरच्या डोक्यात आणि हातावर कोयत्याने वार केले.
'आम्ही इथले भाई आहोत!'
मारहाण करताना आरोपींनी आर्यनला लाथा-बुक्क्यांनीही मारले. हल्ला केल्यानंतर आरोपींनी त्यांच्या हातातील कोयते हवेत फिरवत 'आम्ही इथले भाई आहोत, आमच्या नादाला लागू नका' अशा धमक्या दिल्या. त्यानंतर, त्यांनी आर्यनच्या गाडीवर कोयत्याने वार करून तिचे नुकसान केले आणि घटनास्थळावरून पळ काढला.
आठही आरोपींना अटक
या घटनेनंतर फिर्यादी आर्यनने सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपी विनोद तलवारे (१९) सह अनिकेत अनिल खेडे (२०), प्रणव अमर रोखडे (२०), वेदांत राजेश साईल (१९), अविष्कार अंकुश मोरे (२०), ऋतुपर्ण शशिकांत कडलग (१९), आदित्य विश्वंभर सूर्यवंशी (१९) आणि असित राहुल घिवार (१८) या सर्व आठ आरोपींना अटक केली आहे.