पिंपळे सौदागरमध्ये भीषण अपघात; तरुण दुचाकीस्वार ठार
पुणे: पिंपळे सौदागर येथे भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात एका २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. बीआरटी बस मार्गाच्या रेलिंगला धडकून हा अपघात झाल्याचे सांगवी पोलिसांनी सांगितले.
नेमकं काय घडलं?
९ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ११:२५ वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी सांगवी पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई विजय संतराम थोरात यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, वेदांत बबन मुसने (वय २३, रा. पिंपळे सौदागर) हा त्याची केटीएम दुचाकी (एम.एच.-२३/बी.बी./०७०७) घेऊन कोकणे चौकाकडून भोसरीच्या दिशेने भरधाव वेगाने जात होता.
मॅक्स शोरूमसमोर विरुद्ध बाजूला असलेल्या बीआरटी बस मार्गाच्या रेलिंगला त्याची दुचाकी धडकली. या धडकेत वेदांत दुचाकीसह रेलिंगवर आदळला. गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.
गुन्हा दाखल
या घटनेनंतर सांगवी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वेदांत मुसने याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात बी.एन.एस. कलम १०६ (१), २८१ आणि मोटर वाहन कायदा कलम १८४, ११९/१७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.