८२ कोटींचा सायबर क्राईम: पुण्यात 'फ्युचरिझम टेक्नॉलॉजीज' कंपनीचा गोपनीय 'सोर्स कोड' चोरीला!
पुण्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली असून, 'फ्युचरिझम टेक्नॉलॉजीज प्रा. लि.' (Futurism Technologies Pvt. Ltd.) या नामांकित IT कंपनीतून तब्बल ८२ कोटी रुपयांची सायबर चोरी (cyber theft) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कंपनीच्या गोपनीय आणि कॉपीराइट संरक्षित Source Code आणि Software Solutions ची चोरी करून आरोपींनी कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन मुख्य आरोपींसह एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. यामुळे पुण्यातील टेक विश्वात (Pune tech world) मोठी चर्चा सुरू झाली आहे.
माहितीनुसार, माहे एप्रिल २०२४ पासून आजपर्यंत कंपनीचे माजी कर्मचारी आणि आरोपी विश्वजीत मिश्रा, नयुम शेख आणि सागर विष्णु यांनी संगनमत करून कंपनीसोबतचे करार मोडून हा मोठा गुन्हा केला. आरोपींनी कंपनीचा गोपनीय डेटा (data) चोरून नवीन कंपनी स्थापन केली. या नव्या कंपनीद्वारे त्यांनी 'फ्युचरिझम टेक्नॉलॉजीज'च्याच तंत्रज्ञानाचा वापर करून बेकायदेशीर वेबसाइट्स तयार केल्या आणि स्वतःच्या फायद्यासाठी कोट्यवधी रुपयांची कमाई केली.
फिर्यादी दत्तात्रय प्रभाकर काळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी तब्बल १०० बेकायदेशीर वेबसाइट्स विकसित करून कंपनीच्या मार्केट रेव्हेन्यूचे (market revenue) मोठे नुकसान केले आहे. या सायबर गुन्ह्यामुळे कंपनीला एकूण ८२ कोटी रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे.
या गंभीर गुन्ह्याबाबत हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी भा.न.स. २०२३ चे कलम ३१६ (२), ३१६ (५), ३१८ (४), ३ (५) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ४३, ६६, ७२ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणातील एका महिला आरोपीचा शोध सुरू असून अद्याप तिला अटक करण्यात आलेली नाही.
पुण्यासारख्या IT हबमध्ये अशा प्रकारे सायबर गुन्हेगारी वाढत असल्यामुळे सायबर सुरक्षेची (cyber security) गरज अधोरेखित झाली आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून होणारे हे गुन्हे रोखण्यासाठी कंपन्यांना अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.