फुरसुंगी येथे विवाहितेची आत्महत्या; सासरच्या छळाला कंटाळून जीवनयात्रा संपवल्याचा आरोप

 

पुणे:
फुरसुंगी येथील राचंडवाडी परिसरात कौटुंबिक छळाला कंटाळून एका २४ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी विवाहितेच्या वडिलांनी सासरच्या मंडळींवर शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

नेमकं काय घडलं?

नाशिक येथील रहिवासी रवि हिरामण खलसे (वय ५०) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांची मुलगी सीमा अक्षय राखपसरे (वय २४) हिचा विवाह ६ जुलै २०२० रोजी अक्षय सुरेश राखपसरे यांच्यासोबत झाला होता. लग्नानंतर सुरुवातीला सर्व काही ठीक होते, मात्र काही काळानंतर परिस्थिती बदलली. सीमाचा पती अक्षय कोणताही कामधंदा करत नव्हता, त्यामुळे कुटुंबाचा संपूर्ण खर्च सीमाच्या माहेरचे लोक करत होते.

छळ आणि पैशाची मागणी

फिर्यादीनुसार, सीमा तिच्या पतीला काम करण्यासाठी सतत सांगत असे, ज्यामुळे तिच्या आणि सासरच्या लोकांमध्ये सतत वाद होत होते. सीमाच्या मोठ्या जावेची (पूजा अविनाश राखपसरे) सासूशी जवळीक असल्यामुळे ती सतत सीमाच्या विरोधात चुगल्या करत होती. तसेच, सीमाचा दीर अविनाश राखपसरे आणि सासू आशा सुरेश राखपसरे हे तिला शिवीगाळ आणि मारहाण करत होते. सीमाने बचत गट काढून किराणामालाचे दुकान सुरू केले होते, त्यासाठीही तिचे माहेरचे लोक तिला आर्थिक मदत करत होते. सासरचे लोक तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करत असल्याचा आरोपही फिर्यादींनी केला आहे.

आत्महत्या की घातपात?

६ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५:०० वाजता सीमाच्या चुलत सासऱ्याने फोन करून 'सीमा हिने गळफास लावून आत्महत्या केली आहे,' अशी माहिती दिली. हे ऐकून खलसे कुटुंबीय पुण्यातील महेश स्मृती हॉस्पिटल, शेवाळवाडी येथे दाखल झाले. तिथे डॉक्टरांनी त्यांना सीमा मयत झाल्याचे सांगितले. पोस्टमॉर्टम अहवालात तिच्या मृत्यूचे कारण 'गळफास' असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

या घटनेनंतर रवि खलसे यांनी आपल्या मुलीला तिचा पती अक्षय राखपसरे, चुलत सासरे वसंत राखपसरे, सासू आशाबाई राखपसरे, दीर अविनाश राखपसरे आणि जाऊ पूजा राखपसरे यांनी दिलेल्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post