आकुर्डी, पुणे: पिंपरी-चिंचवड शहरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे. आकुर्डी येथे एका भरधाव 'छोटा हत्ती' टेम्पोने पोलिसांच्या दुचाकीला धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात पोलीस अधिकारी जखमी झाले असून, टेम्पोचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
नेमकं काय घडलं?
११ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ७:४० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंद भाऊ साळवी हे त्यांच्या दुचाकीवरून बिजलीनगरहून निगडीकडे जात होते. आकुर्डी येथील संभाजी चौकातून ते उजवीकडे म्हाळसाकांत चौकाकडे वळण घेत असताना, भेळ चौकाकडून एका फिक्कट पिवळ्या रंगाच्या 'छोटा हत्ती' टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
पोलिसांना किरकोळ दुखापत, टेम्पो चालक फरार
हा अपघात टेम्पोचालकाच्या निष्काळजीपणामुळे आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे घडला. धडकेमुळे आनंद साळवी यांच्या दुचाकीचे नुकसान झाले असून, त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. धडक दिल्यानंतर टेम्पोचालक न थांबता लगेच घटनास्थळावरून पळून गेला.
गुन्हा दाखल, आरोपीचा शोध सुरू
या प्रकरणी आनंद साळवी यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (अ), ३२४ (४) आणि मोटार वाहन अधिनियम १८४, ११९/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने पोलीस फरार टेम्पोचालकाचा शोध घेत आहेत.