पुणे: चंदननगर येथील आंबेडकर वसाहत परिसरात छेडछाडीच्या वादातून एका ३५ वर्षीय तरुणाचा हॉकी स्टिक आणि हाताने मारहाण करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
१२ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८:३० ते १०:०० च्या दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी चंदननगर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार राहुल गिरमे यांनी फिर्याद दाखल केली आहे. मयत तरुणाचे नाव साईनाथ उर्फ खलीबली दत्तात्रय जानराव (वय ३५) असे आहे.
आरोपी सोन्या उर्फ आदित्य संतोष वाल्हेकर (वय २१) आणि समर्थ उर्फ करण पप्पु शर्मा (वय २२) यांनी साईनाथने त्यांच्या चुलतीची छेड काढल्याच्या कारणावरून वाद घातला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी साईनाथला हॉकी स्टिक आणि हाताने बेदम मारहाण केली, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
दोन्ही आरोपींना अटक
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) आणि ३ (५) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.