बेदरकार आयशर ट्रकने घेतला १८ वर्षीय तरुणीचा बळी; आरोपी चालकाला अटक

  


बेदरकार आयशर ट्रकने घेतला १८ वर्षीय तरुणीचा बळी; आरोपी चालकाला अटक

महाळुंगे एमआयडीसी, दि. १२ ऑगस्ट - पुणे जिल्ह्यातील महाळुंगे एमआयडीसी परिसरात एका भरधाव आयशर ट्रकने एका १८ वर्षीय तरुणीला चिरडले. हा भीषण अपघात १२ ऑगस्ट रोजी सकाळी ९.४० वाजताच्या सुमारास घडला. या घटनेत रिया जयप्रकाश सहाणी (१८) हिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी आरोपी ट्रकचालकाला अटक केली आहे.


याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गु. रजि. नं. ५८९/२०२५ भा.न्या.सं. कलम १०५, २८१, १२५ (अ), १२५ (ब) आणि मो.वा.का.क. १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी राहुल जयप्रकाश सहाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची बहीण रिया सहाणी ही महाळुंगे-निघोजे रोडवरून पायी जात असताना हा अपघात झाला.


असा घडला अपघात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गजानन मारुती पानचावरे (वय ३२, रा. उरुळी देवाची) हा आयशर ट्रक (एम.एच.०९/ई.एम.९०२६) घेऊन महाळुंगे बाजूकडून निघोजेच्या दिशेने भरधाव वेगाने जात होता. त्याने निष्काळजीपणे आणि धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्याने, वळणावर ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक पलटी होऊन पायी चालणाऱ्या रिया सहाणीच्या अंगावर पडला.


या अपघातात रिया सहाणीच्या हात, पाय, चेहरा आणि संपूर्ण शरीरावर गंभीर जखमा झाल्या आणि तिचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी चालकाला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस उपनिरीक्षक मुल्ला या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post